वै.ह. भ. प.दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नवी मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२६ : सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत वाटचाल करणाऱ्या वै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी पतसंस्था मर्यादित, नवी मुंबई या संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सवी सोहळा रविवारी उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष सभेला सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व सभाध्यक्षांच्या निवडीने झाली. यावेळी संस्थेचे दिवंगत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवर नियमानुसार चर्चा करण्यात आली.
संस्थेचे व्यवस्थापक श्री. महादेव गा. निकम यांनी सभेची प्रस्तावना करताना संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला. सभेतील नियोजित विषयपत्रिकेनुसार मागील २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, संस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर करणे, लेखापरीक्षण व दोषदुरुस्ती अहवाल, वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती, वार्षिक अर्थसंकल्पास मंजुरी, नफा विभागणी, आदर्श उपविधी स्वीकारणे तसेच पोटनियम दुरुस्ती आदी विषयांवर चर्चा करून आवश्यक मंजुरी देण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित झालेल्या विषयांवरही सभासदांनी चर्चा केली.
सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद : विठ्ठलराव धुमाळ अध्यक्ष
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव ग. धुमाळ यांनी उपस्थित सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून, संस्थेवर विश्वास ठेवून ठेवी ठेवणाऱ्या प्रत्येक ठेवीदाराला वेळेवर व्याज मिळावे, तसेच ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेवीदाराची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संस्थेकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“बचत ही आपल्या भविष्यातील आनंदाची आणि ताकदीची आधारशिला आहे. आज केलेली बचत हीच उद्याच्या काळात आपल्या भविष्याची ताकद ठरते. त्यामुळे प्रत्येक सभासदाने बचतीला प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असे अध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले.
संस्थेमध्ये प्रत्येक सभासदाच्या ठेवीची आणि त्यांच्या रकमेची विशेष काळजी घेतली जाते. संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्ग संस्थेच्या आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत असून, संस्थेचा एकही रुपया अनावश्यक खर्चासाठी वापरला जाऊ नये, याची दक्षता घेतली जाते. या आर्थिक शिस्तीमुळेच संस्था आजपर्यंत सुस्थितीत आणि चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. सभासदांचा विश्वास कायम राखत भविष्यात संस्थेच्या सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
संचालक मंडळाची उपस्थिती
रौप्य महोत्सवी वर्षातील या विशेष सभेला संस्थेच्या संचालक मंडळाची उपस्थिती लाभली. संस्थेचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव ग. धुमाळ, उपाध्यक्ष श्री. सुभाष वि. शिंदे, सचिव श्री. अमृत शं. भंडारी, खजिनदार श्री. महादेव भा. पालवे, संचालक श्री. ब्रह्मदेव शा. देशमुख, श्री. विलास ज. सवकाळ, श्री. जययराज भु. कदम, संचालिका सौ. शैला शं. शिंदे, सौ. सुनंदा शं. राऊत, तज्ञ संचालक श्री. शंकर भा. सुर्वे आणि तज्ज्ञ संचालक श्री. सुरेश द. विश्वासराव उपस्थित होते.
या सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू असून, सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेची वाटचाल पुढे सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कर्मचारी वर्गाच्या योगदानाचाही गौरव
संस्थेच्या दैनंदिन कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचारी वर्गाचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महादेव गा. निकम, शाखा व्यवस्थापक श्री. विशाल बा. शिंदे, शाखा व्यवस्थापक श्री. सचिन शं. शिंदे, रोखपाल सौ. संगीता अ. जाधव आणि लिपिक श्री. सिद्धेश शं. भणगे हे संस्थेच्या कामकाजात योगदान देत आहेत.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
रौप्य महोत्सवी सोहळ्यास एसबी न्यूजचे संपादक व पत्रकार संजय पाटील, डीडी न्यूज अर्थात ‘दिव्यांग दिशा’चे संपादक सुरेश दुधाने आणि ‘खाकी करिअर अकॅडमी’चे संस्थापक मयूर धुमाळ सर यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करत संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रौप्य महोत्सवी सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा जाहीर सत्कार सोहळा. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या पालकांसह संस्थेचा नावलौकिक वाढविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय सत्कार करण्यात आला. अनन्या भाऊसाहेब आव्हाड, अनुश्री विक्रम देशमुख, आर्यन सचिन शिंदे, सिद्धी अमोल जाधव,श्रीया विशाल शिंदे, श्रीतेज महादेव निकम,आर्या संतोष वरकड,,श्रुती नारायण फुलसुंदर, रुतिशा राहुल निकम, आरती भाऊसाहेब आव्हाड, आर्यन बजरंग कदम, क्षितीज तुकाराम कदम व पायल विजय कांबळे, हर्षित प्रकाश शिंदे, श्रेया नारायण फुलसुंदर तसेच पदवी शिक्षणातील श्रावणी महादेव निकम, विपुल प्रकाश जाधव, सिद्धी संजय निकम आणि विघ्नेश रविंद्र धोंडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि यशाचे मान्यवरांनी कौतुक केले. पतसंस्थेच्या वतीने सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी, उज्ज्वल करिअरसाठी आणि यशस्वी भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कारामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्येही आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची संस्थेची ही उपक्रमशील परंपरा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी असून, शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक सुंदर उदाहरण ठरले.
२५ वर्षांचा विश्वास आणि पुढील वाटचालीचा संकल्प
दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाची मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. रौप्य महोत्सवी वर्ष हे संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा गौरव करण्याबरोबरच भविष्यातील प्रगतीचा संकल्प करण्याचे वर्ष ठरले.
सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देत बचतीला प्रोत्साहन देणे, ठेवीदारांचा विश्वास कायम राखणे आणि संस्थेच्या सेवा अधिक सक्षम करणे, या दिशेने पुढील वाटचाल करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानण्यात आले. व्यवस्थापक श्री. महादेव निकम यांच्या प्रस्तावनेने सुरू झालेला हा रौप्य महोत्सवी सोहळा तसेच सभेसाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्री शशिकांत राऊत नमुमनपा अभीयंत्रिकी सभापती, श्री राजाराम ओंबळे माजी अध्यक्ष जवळी बँक श्री मयूर धुमाळ खाकी पोलीस अकादमी, या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,अध्यक्ष श्री. विठ्ठलराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वी झाला. अखेरीस पवित्र पसायदानाने संस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली.